VicksWeb upgrade Location upload ads trending
VicksWeb भारत

वर आपले स्वागत आहे VicksWeb

Flag Counter
मिसेस सीएम, स्वच्छ हवा ‘वर्षा’वरही मिळते, जीव धोक्यात घालू नका : निरुपमांचा सल्ला 
Source:  PRAHAAR
Monday, 22 October 2018 19:05

 प्रहार वेब टीम
मुंबई : अमृता फडणवीस यांना शुध्द हवाच घ्यायचीच असेल, तर वर्षा बंगल्याच्या बाहेर समुद्र किनारी खूप शुध्द हवा मिळेल. त्यासाठी जीव धोक्यात घालण्याची काय गरज आहे? त्यांनी जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नये, असा सल्ला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिला.
मुंबई – गोवा  प्रवासी वाहतूक करणाऱ्या “आंग्रिया” या आलिशान क्रूझचे उदघाटन नुकतेच मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि भूपृष्ठ  वाहतूक मंत्री गडकरी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी क्रूझच्या डेकच्या टोकावरून केलेले सेल्फीसेशन सध्या टीकेचा विषय ठरले आहे. या सेल्फीसेशनवरून फडणवीस यांना नेटकऱ्यानी चांगलेच “ट्रोल” केले. शेवटी “मी तिथे शुद्ध हवा घेण्यासाठी गेले होते, माफी मागण्यास मी तयार आहे” अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी सोमवारी घेतली.
यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना विचारले असता ते म्हणाले की, अमृता फडणवीस या मुंबई येथे आल्यानंतर त्यांनी स्वतःत केलेला बदल अभिनंदनीय आहे. त्या उत्तम गातात सुध्दा. त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या आहेत. पण यासोबतच त्यांनी शासकीय सुरक्षेचा जो राजशिष्टाचार आहे, तो सुध्दा शिकून घ्यावा. त्यांनी सेल्फी काढण्याच्या नादात राजशिष्टाचार मोडला आहे.

शिवशाहीच्या मद्यधुंद चालकावर गुन्हा
Source:  Lokmanthan
Monday, 22 October 2018 18:45

सातारा (प्रतिनिधी) : मद्य प्राशन करुन शिवशाही बस चालवणार्‍या चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रत बाळकृष्ण कदम (रा. सायगाव, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बसस्थानक प्रमुख राहुल शिंगाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राहुल शिंगाडे हे सातारा बसस्थानकात बस तपासणीचे काम करत होते. त्यावेळी शिवशाही बस (एमएच 14 बीजी 1664 ) तपासत होते. त्यावेळी या बसचालकाने मद्यप्राशन केले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता, चालकाने आपण दारू पिल्याचे कबूल केले. याप्रकरणी चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करत आहेत.

उदयनराजे, शिवेंद्रराजे दारू दुकानावरून आमने सामने
Source:  PRAHAAR
Monday, 22 October 2018 18:42

अजित जगताप : प्रहार वेब टीम
सातारा : देशी दारू दुकान पाडण्याच्या मुद्द्यावरून खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंह राजे साताऱ्यात सोमवारी (दि. २२) दुपारी आमने सामने आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी  हस्तक्षेप केल्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. बघ्यांच्या गर्दीला पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला.
सातारा शहरातील व्यापारी समीर प्रभाकर खुटाळे यांच्या जागेत ४८ वर्षापासून नगरसेवक रवी ढोणे यांच्या कुटूंबाच्या मालकीचे देशी दारूचे दुकान भाड्याने आहे. या जागेबाबत सातारा व मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला होता.  या दुकानासाठी मुळ मालकाने कोणतीही हरकत घेवू नये असा आदेश काढला होता. रवी ढोणे हे आमदार शिवेंद्रसिंह राजे गटाचे आहेत. तर पालिकेवर खा. छ. उदयनराजेंची सत्ता आहे.
खा. उदयनराजे भोसले हे देशी दारू दुकान काढण्यासाठी नगरपालिका अतिक्रम हटाव पथक घेवून आले होते. याची माहिती मिळताच मतदारसंघात गेलेले आ. शिवेंद्रसिहराजे हे तातडीने कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे दुकान पाडण्याचा आदेश आहे का? असा सवाल केला. तर खा. उदयनराजे यांनी हे दुकान पाडाच अशी भुमिका घेतली. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक राजमाने फौजफाटा घेवून दाखल झाले. दोन्ही राजेंचे कार्यकर्तेही दाखल झाले होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना जायला सांगा, मग मी जातो, अशी भूमिका घेतली.  दोन्ही राजे हटायला तयार नव्हते. यामुळे पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांचा पारा चढला. राजमाने यांनी सुरवातीला दोन्ही राजांना समजावून सांगितले. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी राजमाने यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या गाडीतील नगरसेवक अमोल मोहिते, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, शैलेश देसाई या कार्यकर्त्याना खाली उतरवले. सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर हे गाडीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या शेजारी बसले. त्यांनी गाडी घेऊन चला असे सांगितले. शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘खासदार जाणार नाहीत, तोपर्यंत मी जाणार नाही’, असे राजमाने यांना सुनावले.
पोलीसांनी घेतला बघ्यांचा समाचार
त्यानंतर राजमाने हे खासदार उदयनराजेंकडे गेले “तुमचीही गाडी जाऊ द्यात”, अशी विनंती त्यांनी केली. यानंतर खासदारांची गाडी उत्तरेकडे तर आमदारांची गाडी दक्षिणेकडे गेली. नंतर पोलीसांनी बघ्यांचा चांगलाच समाचार घेतला. बघे वाट मिळेल त्यादिशेने पळत सुटले. या धामधूमीत अनेक दारू पिणारे ग्राहक पैसे न देताच पळून जाण्यात यशस्वी ठरले. या वातावरणामुळे नेहमीप्रमाणे नदी काठावरून खेकडे, मासे विकण्यासाठी बाजारात आलेल्या कातकरी समाज व ग्राहकवर्गाची चांगलींच तारांबळ उडाली होती.

अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी
Source:  Lokmanthan
Monday, 22 October 2018 18:30


वडूज (प्रतिनिधी) : अपघातात जखमी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विनायक श्रीमंत साळुंखे (रा. कांचनपूर ता. मिरज जि. सांगली) यास वडूज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एन. पाठक यांनी दोषी धरून तीन महिने सक्तमजुरी व बाराशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आरोपी विनायक श्रीमंत साळुंखे दि. 26 डिसेंबर 2014 रोजी त्यांच्या ताब्यातील मारुती वॅगनआर या चारचाकी वाहनाने पोपट भगवान माळी (रा. वांझोळी ता. खटाव जि. सातारा) यांना भरधाव वेगाने पुसेसावळी-कराड रोडवर चुकीच्या बाजूने जाऊन धडक देऊन गंभीर जखमी केलेले होते. या अपघाताची माहिती व तक्रार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दत्तात्रय दादासो मगर (रा. पुसेसावळी ता. खटाव) यांनी औंध पोलीस ठाण्यात दिलेली होती. या अपघाताची नोंद औंध पोलीस ठाण्यात होऊन गुन्हा नोंद झाला होता. सदर अपघातानंतर जखमी होऊन पोपट भगवान माळी यांचा मृत्यू झाला होता. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे रमेश साळुंखे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी कामकाज पाहिले. साक्षीदाराची साक्ष सरकारी अभियोक्त्यांचा युक्तीवाद व पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी विनायक साळुंखे यास दोषी धरून शिक्षा ठोठावली. याकामी अभियोग पक्षास पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉड चे तौसिफ शेख, सहाय्यक फौजदार शिवाजी पायमल, प्रदीप गोसावी, सुधीर मोहिते, पोलीस हवालदार विलास हांगे यांनी सहकार्य केले.

मुंबईतील ओला, उबर चालक बेमुदत संपावर
Source:  Maharashtra Times
Monday, 22 October 2018 18:24


कोळी महादेव जमातीचा अमरावतीत ‘आक्रोश’ मोर्चा
Source:  PRAHAAR
Monday, 22 October 2018 18:19

प्रहार वेब टीम

अमरावती : कोळी महादेव जमातीच्या आक्रोश मोर्चाने अमरावती दणाणून सोडली आहे. ”कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोळी महादेव समाजाला घटनादत्त अधिकार देण्यात यावे तसेच अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. यावेळी गोपाळराव ढोणे, विलासराव सनगाळे, सुधाकरराव घुगरे, मारुती सिरसाट, श्रीराम अनकुरकार, संजय तराळे, रामदास वडाळ, प्रकाश तरोळे आदी उपस्थित होते. कोळी महादेव ही जमात आदिवासी असूनही शासन जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. भांडे म्हणाले की, आमचा आक्रोश सहन करणे सरकारला परवडणार नाही. यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही. आपल्या मागण्यांचे निवेदन मोर्चाकर्त्याच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले.


अनु मलिकच्या जागी येणार संगीतक्षेत्रातील ‘ही’ जोडी
Source:  PRAHAAR
Monday, 22 October 2018 18:18

प्रहार वेब टीम

मुंबई : लैंगिक छळवणूकीचे आरोप झालेले संगीतकार अनु मलिक चांगलेच अडचणीत आले आहेत. सध्या चालू असलेल्या ‘इंडियन आॅयडॉल १०’ या संगीत रिअ‍ॅलिटी शोमधून परीक्षक असलेल्या अनु मलिकला काढण्यात आले. अनु मालिकची जागा संगीत क्षेत्रातील प्रख्यात जोडी सलिम-सुलेमान घेणार असल्याची चर्चा आहे.

पार्श्वगायिका सोना महापात्रा आणि श्वेता पंडित यांनी अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. सध्या अनु मलिक सोनी या हिंदी वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल १०’ या संगीत रिअ‍ॅलिटी शोचे परिक्षक आहेत. अनु मलिक यांच्यावर टिका सुरू झाल्यापासून सोनी वाहिनीच्या टिममध्ये त्यांच्या कराराविषयी चर्चा सुरू झाली. पुढील चौकशी होईपर्यंत सोनी वाहिनीने अनु मालिकला परिक्षक पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील भागाचे त्यांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे. अनु मलिक यांच्यासोबत नेहा कक्कड आणि विशाल दादलानी परिक्षक म्हणून आहेत. अनु मलिकच्या जागी संगीत क्षेत्रातील प्रख्यात जोडी सलीम-सुलेमान येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.


जिल्हा अजिंक्यपद कबड्डीत पुरूषांमध्ये चिपळूण तर महिलांमध्ये खेडची बाजी
Source:  PRAHAAR
Monday, 22 October 2018 18:15

प्रहार वेब टीम

दापोली : रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रंगलेल्या जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरूषांमध्ये चिपळूण तर महिला संघात खेड ‘अ’संघाने बाजी मारली आहे. विजेत्या संघांचा आमदार संजय कदम यांच्या हस्ते मानाचा असलेला अजिंक्यपदाचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

या स्पर्धेमध्ये पुरूषांच्या गटामध्ये संगमेश्वर ‘अ’ विरूध्द चिपळूण ‘अ’ या दोन संघामध्ये अंतिम सामना रंगला. या अटीतटीच्या सामन्यांमध्ये चिपळूणच्या वैभव गुरव व ओंकार कुंभार यांच्या बहारदार चढायांमुळे विजश्री खेचून आणली. हा सामना चिपळूण ‘अ’ ४० तर संगमेश्वर ‘अ’ १३ अशा प्रकारे तब्बल २७ गुणांनी चिपळूण ‘अ’ संघ विजयी झाला.

आमदार संजय कदम, अध्यक्ष मंगेश मोरे आदींच्या उपस्थितीत अजिंक्यपद स्विकारताना खेड ‘अ’ महिला विजयी संघ

महिलांमध्ये चिपळूण ‘अ’ संघ खेड ‘ब’ संघावर मात करून तर खेड ‘अ’ संघ चिपळूण ‘ब’ संघावर मात करून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. त्यामुळे फायनलचा सामना चिपळूण ‘अ’ विरूध्द खेड ‘अ’ या दोन संघामध्ये रंगला. हा अंतिम सामना अटीतटीचा झाला व दापोलीतील प्रेक्षक वर्गाला मेजवानीच मिळाली. यामध्ये चिपळूण ‘अ’ संघामध्ये नाझिया मनियार व गौरी कदम यांच्या बहारदार चढायांनी तर खेड ‘अ’ या संघामध्ये सिध्दी चाळके व समरिन बुरोंडकर यांच्या उत्कृष्ठ चढायांमुळे सामन्यामध्ये रंगत आणली. तर खेड ‘ब’ संघामध्ये रोहिणी बैकर व तस्मिन बुरोंडकर यांच्या रंगतदार पकडींनी दापोलीतील प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यांमध्ये चिपळूण ‘अ’ २७ तर खेड ‘अ’ २९ अशा दोन गुणांनी खेड ‘अ’ संघाने विजय संपादन करून अजिंक्यपद आपल्याकडे ठेवले.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रंगल्या होत्या. या कबड्डी स्पर्धांना क्रिडा रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. अनेक मान्यवरांनी तीन दिवसांत या स्पर्धांना हजेरी लावुन खेळांडुना शुभेच्छा दिल्या. तसेच दापोली तालुका कबड्डी असोसिएशचे कौतुक केले.

या स्पर्धांचे औचित्य साधून रत्नागिरी कबड्डी असोसिएशन व दापोली कबड्डी असोसिएशनने दापोलीतील विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणा-या खेळाडूंचा सत्कार केला. यामध्ये स्केटींगमध्ये दोन वेळा जागतिक विक्रम आपल्या नावावर करणा-या मंडणगड मधील पालवणीची सुकन्या स्वराली सत्यवान दळवी हिचा सत्कार दापोली- खेड- मंडणगडचे आमदार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. स्वराली दळवी ही ‘दैनिक प्रहार’चे दापोली तालुक्यातील वार्ताहर सत्यवान दळवी यांची ज्येष्ठ सुकन्या आहे.

दोन वेळा जागतिक विक्रम करणारी मंडणगड पालवणीची सुवर्ण कन्या स्वराली सत्यवान दळवी हिचा सत्कार करताना आमदार संजय कदम व पदाधिकारी

वंचितांच्या सेवेतच जीवनाचे सार्थक व समाधान -अभिषेक कळमकर
Source:  Lokmanthan
Monday, 22 October 2018 18:15


अहमदनगर (प्रतिनिधी)- विजया दशमी निमित्त कुष्ठधाम मधील ज्येष्ठ नागरिकांना चादर व ब्लॅकेटचे वाटप करुन राष्ट्रवादीच्या युवकांनी सिमोल्लंघन केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस लंकेश चितळकर यांच्या पुढाकाराने हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, रा.स.प. जिल्हाध्यक्ष बबनतात्या पडोळकर, नगर तालुकाध्यक्ष दादा दरेकर, साकतचे सरपंच पाराजी चितळकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, शिवाभाऊ चव्हाण, महेश ससे, शहर उपाध्यक्ष शेहेजाद खान, सय्यद अन्सार, शहर सरचिटणिस सतीष ढवण, साधनाताई बोरुडे, विशाल लबडे, चंद्रकांत जठार, तात्यासाहेब वाघमोडे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लंकेश चितळकर म्हणाले की, वंचितांच्या चेहर्‍यावर फुलवलेल्या हसूचे समाधान मोठे आहे. सण-उत्सवाचा आनंद वंचितांसमवेत द्विगुणीत करण्यातच खरा समाधान आहे. आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत कार्य चालू आहे. त्यांच्या प्रेरणेने वंचित घटकांना मदत करण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अभिषेक कळमकर म्हणाले की, वंचितांच्या सेवेतच जीवनाचे सार्थक व समाधान आहे. खर्‍या गरजवंतांना केलेली मदत सत्कर्मी लागते. विकासात्मक राजकारणाबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्येकर्ते समाजकारणाला महत्त्व देऊन कार्य करीत आहे. कुष्ठधाम मधील ज्येष्ठ नागरिक हे समाजातील एक घटक असून, युवकांनी विजया दशमीचे औचित्य साधून त्यांच्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी गरजले ; ऊस उत्पादकांचे पैसे न देणाऱ्या कारखानदारांना गाडल्याशिवाय राहणार नाही 
Source:  PRAHAAR
Monday, 22 October 2018 18:04

प्रहार वेब टीम 
वडूज :  सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे आठ आठ महिने न देणाऱ्या प्रस्थापित साखर कारखानदारांना  गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते नुकतेच खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी चितळीमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
केन अँग्रो साखर कारखान्याने खटाव तालुक्यातील उसउत्पादकांचे पैसे अद्याप दिले नाहीत, याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा सुरू  केला आहे. या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आणि २७  ऑक्टोबरच्या जयसिंगपूरमधील १७ व्या ऊस परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी खासदार  राजू शेट्टी यांचा हा दौरा होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उस उत्पादकाना आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. खटाव तालुक्यातील उसउत्पादकांनाही लढाईसाठी तयार रहावे लागेल, असे आवाहन शेट्टी यांनी केले. खटाव तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, केन ऍग्रोची रखडलेली बिले तातडीने द्यावीत, आणि गोपूजसह इतर  साखर कारखान्यांनी ३०० ते ४०० रुपयांचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी दयावा, या सर्व मागण्या शेट्टी यांनी मांडल्या.
खटाव तालुक्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांनी लोकांना गुलामगिरीत ठेवले आहे. सामान्य लोक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित होत आहेत, ही बाब त्यांना रुचेनशी झाली आहे. म्हणून या सभेसाठी पुढाकार घेणाऱ्या चितळी आणि गुंडेवाडीतील युवकांना त्रास देण्याचा प्रयत्न  करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.  यावेळी चितळी, गुंडेवाडी, हिंगणे, मांडवे, मायनीमधल्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
या कार्यक्रमानंतर गुंडेवाडी (मराठा नगर)येथे संघटनेच्या शाखेचे उदघाटन खासदार  राजू शेट्टी यांनी केले.
या सभेसाठी राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे, राजू शेळके,  माजी उपसभापती नाना पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले.

<< < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > >>